पिंपरी (Pclive7.com):- तळेगाव चाकण चौकात वाहतूक नियमन करताना पोलिस शिपाई रविंद्र करवंदे यांच्यावर झालेला हल्ला हा खरंतर दुर्दैवी प्रकार आहे. राज्यात वारंवार अशा घटना घडत असून, हेे राज्य सरकारचे अपयश आहे. यापुढे पोलिसांवरील हल्ले कदापि सहन करणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (दि.०१) चाकण येथील हल्ल्यातील जखमी वाहतूक पोलीस शिपाई रविंद्र करवंदे यांची कासारवाडी येथील मॅक्स न्युरो हॉस्पिटल येथे भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, भाजपा सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, नगरसेवक कुणाल लांडगे आदी उपस्थित होते.
प्रविण दरेकर म्हणाले की, चाकण येथे रवींद्र करवंदे नावाच्या वाहतूक पोलीसाला त्याठिकाणी दोन जणांनी रॉडने मारहाण करून मोठ्या प्रमाणावर जखमी केले. खरंतर ही शरम आणणारी गोष्ट आहे. कारण जो पोलिस आपल्या सुरक्षेची काळजी घेतो त्याच पोलिसाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. ही राज्याला शोभा देणारी गोष्ट नाहीये. आणि म्हणून आवर्जून मी त्या संवेदना घेऊन आज या ठिकाणी रवींद्र करवंदे यांना भेटलो. त्यांच्या चौकशीची तब्येतीची चौकशी केली. शेवटी पोलिसांचे मनोबल खचले जाऊ नये असं मला वाटते. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. असा एक दिवस नाही की कुठेतरी पोलिसांवर हल्ला होत नाही.
मुंबईत देखील पोलीसांवर हल्ला झाला होता, तेव्हाही मी उपोषण केलं होतं. त्यामागची भावना हीच की आता यापुढे पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही. पोलीस आमची सुरक्षा घेतात, ज्या पोलिसांमुळे या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत. उद्या जर त्याच्या सुरक्षितेची याठिकाणी चिंता असेल तर कोणाकडे मागणी करायची? ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने निदान या प्रकरणात गांभीर्याने दखल घेत या सगळ्या व्यवस्थेवर नीट लक्ष ठेवावे. यापुढे अशी हिम्मत कोणी करणार नाही. यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांशी तसेच मुख्यमंत्री यांना भेटून याप्रकरणी कारवाईची मागणी करणार असल्याचे शेवटी त्यांनी बोलताना सांगितले.