पिंपरी (Pclive7.com):- स्थायी समिती सभापती पदाचे प्रबळ दावेदार असणारे भाजपाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांना डावलण्यात आले आहे. भोसरीतील नितीन लांडगे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रवी लांडगे यांनी भेट घेतली होती. आणि त्या भेटीमुळेच त्यांचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रवी लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये बिनविरोध निवडून येत भाजपाचे खाते उघडले होते. गेल्या चाळीस वर्षांपासून खांद्यावर भाजपची पताका घेऊन पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजविण्याचे काम करणारे कै. अंकुशराव लांडगे यांचे राजकीय वारसदार ते आहेत. नगरसेवक रवी लांडगे यांना पाच वर्षात पक्षाकडून महापालिकेतील एकही पद मिळाले नाही. त्यामुळे शेवटच्या वर्षात स्थायी सभापती पद मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी रवी लांडगे यांची स्थायीत वर्णी लावत सभापती पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र रवी लांडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे आणि अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे हे देखील उपस्थित होते. त्यावेळी भाजपातील काही नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
या भेटीमुळेच रवी लांडगे सभापती पदाचे प्रबळ दावेदार असताना सुध्दा ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीयं.
अजितदादांची भेट खाजगी कामासाठी होती..
रवी लांडगे म्हणाले की, आम्ही भाजपाशी प्रामाणिक आहोत. निस्वार्थपणे गेल्या ४० वर्षापासून पक्षाचे काम करत आलोयं. अजित पवार यांना भेटलो होतो. परंतू ती भेट ही खाजगी कामासाठी होती. ती राजकीय भेट नव्हती.