पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी परिसरात मास्क विरोधात कारवाई करताना पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात ‘तोतया सहाय्यक पोलिस आयुक्त’ आला आहे. कुदळवाडीत कारवाई करत असताना प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी या भामट्याला पोलीसांनी अटक केली आहे. कारमधून प्रवास करत असताना त्याने दाखवलेल्या ओळखपत्रावर राजमुद्रा आढळ्याने पोलिसांना संशय आला. पोलीसांच्या चौकशीत तो बनावट सहाय्यक पोलिस आयुक्त असल्याची त्याने कबुली दिल्याने अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहन चालकांवर कठोर कारवाई सुरू आहे. तसेच कोवीड १९ च्या संसर्गाच्या अनुषंगाने विना मास्क फिरणार्या इसमांवर कारवाई निगडी वाहतुक विभागातर्फे सुरू होती. जाधव सरकार चौक कुदळवाडी याठिकाणी नाकाबंदी व विना मास्कची कारवाई करत असताना वाहतुक पोलीस सुनिल गायकवाड यांनी तोतया सहायक पोलीस आयुक्त मुंबई याला त्याच्या बनावट ओळखपत्रासह पकडुन कारवाई केली आहे.
कुदळवाडी येथे होंडा जांज (क्रमांक एम.एच.५०एल.२२१६) या कारमध्ये बसलेल्या दोघांनी मास्क घातलेले नसल्याने कारवाई करीता वाहन बाजुला घेतले असता चालका शेजारी बसलेले इसमांने मुंबई पोलीसांत ए.सी.पी. असल्याचे सांगितले. म्हणून वाहतुक पोलीस सुनिल गायकवाड यांनी त्यांना ओळखपत्र विचारले असता त्यांनी ओळखपत्र दाखविले. त्या ओळखपत्रावर असलेल्या फोटोमध्ये फोटोतील व्यक्तीच्या खांद्यावर राजमुद्रा व स्टार असल्याचे फोटोत दिसत असल्याने ओळखपत्र बनावट असल्याने शंका आली. म्हणून त्यांना जवळच्या कुदळवाडी चौकीत नेण्यात आले. तेथे त्यांची चौकशी केली असता त्याने ते ओळखपत्र बनावट असल्याचे मान्य केले. या प्रकरणी त्या तोतया पोलीसाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (वाहतुक शाखा) सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे, यांच्या मार्गदर्शखाली पोलीस उप निरीक्षक एस.एस. राउत, पोलीस नाईक गायकवाड, दहिफळे, पोलीस शिपाई कशाळे, कोल्हे यांनी केली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.