पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभागाच्या बैठका, मासिक सभा होत नाहीत. त्यामुळे प्रभागातील अनेक कामे रखडली आहेत. त्याअनुषंगाने प्रभागाची ऑनलाईन बैठक घ्यावी अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दिनेश यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभागाच्या बैठका, मासिक सभा होत नाहीत. त्यामुळे प्रभागातील अनेक कामे रखडली आहेत. थोड्याच दिवसांत पाऊसाळा सुरू होईल, तत्पुर्वी केली जाणारी नाला सफाई, पाऊसाळी पाणी वाहुन नेणारी नलिका सफाई, रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे, नदीवर असलेली जलपर्णी काढणे, ही कामे पूर्ण करु घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पाऊसामध्ये येणाऱ्या अचडणी कमी होतील त्याचप्रमाणे धुर फवारणी, औषधे फवारणी याचे नियोजन करणे हे ही महत्त्वाचे आहे.
सध्या कोरोना आजारावर नियंत्रण करण्यासाठी प्रभागावरील नियोजन याबद्दल माहिती लसीकरण बद्दल असलेल्या अडचणी त्यावर उपाययोजना, यासर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी प्रभागावर ऑनलाईन बैठक घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरसदस्य, स्विकृत सदस्य, अधिकारी यामध्ये एक चांगली चर्चा सत्र घडवुन येऊन प्रभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल.
यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही. सध्या महापालिकेची सभा ही ऑनलाईन पध्दतीने होते. त्यामुळे अनेक समस्या सुटतात, पण स्विकृत सदस्यांना समस्या मांडण्यासाठी प्रभागाची बैठक हे एकच व्यासपीठ आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाची ऑनलाईन बैठक घ्यावी अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.