पिंपरी (Pclive7.com):- देहू-आळंदी रोडवरती तळवडे गावच्या हद्दीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ऐतिहासिक महाप्रवेशद्वार प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता. याला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यासाठी प्रभाग क्रमांक १२ चे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या देहू आळंदी बीआरटीएस रस्त्यावरती भव्य प्रवेशद्वार उभारण्यात २८ डिसेंबर २०२० रोजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. यावर ९ जानेवारी २०२१ रोजी ६ कोटीपैकी १ कोटीची अंदाज पत्रकातील तरतूद प्रशासकीय मान्यता मिळाली. यावर २४ जून २०२१ रोजी पालिकेचे कार्यकारी अभियंता यांनी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या पत्राचा संदर्भ घेत कामाची निविदा कार्यवाही करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याबाबत आयुक्तांच्या मान्यतेनंतर निविदा प्रसिद्ध करण्यासाठी पाठविली.
यात मेसर्स किमया या वास्तू विशारद म्हणून नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र शासन संकीर्ण २०१८/प्र. क्र.५४/नावि-१६ अन्वये निविदा स्वीकृत रकमेची निविदा पूर्व व निविदा पश्चात मान्यता देण्याबाबत आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला शांती समता बंधुता व सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र दिला आहे. या दोन महान संतांचे जन्मभूमी व तपोभूमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीलगत आहेत. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणारा देहू आळंदी बीआरटीरोड पिंपरी चिंचवड
महानगरपालिका कडुन विकसित करण्यात आला आहे. या रोडवर महाराष्ट्र व जगभरातून अनेक भाविक येत असतात. या भाविकांना दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय टाळण्यासाठी व स्वागत करण्यासाठी पालिकेने फलक लावले नव्हते. पिंपरी-चिंचवड एमआयडीसी चाकण एमआयडीसी या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांना जोडण्यासाठी तळवडे आयटी पार्कमधून बीआरटी रोड विकसित झाला आहे. या रोडवर भाविकांची वर्षभर ये-जा सुरू असते. याकरिता महापालिकेच्या हद्दीत भव्य महाप्रवेशदार व स्वागत कमान उभारण्यात यावी अशी मागणी पंकज भालेकर यांनी केली होती. त्याच्या या पाठपुराव्याला आज यश मिळाले आहे.