पिंपरी (Pclive7.com):- ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त आम्हा मित्रांचा डान्सचा जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झालायं. त्यात गैर काहीच नाही. ‘आमची मैत्री राजकारणा पलिकडची’ आहे. काल ‘फ्रेंडशिप डे’ होता, भाजपाचे आमदार महेशदादा लांडगे आणि आम्ही जुने मित्र भेटलोत. एकत्र चहा घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी भाजपात गेलेल्या महेशदादांनी राष्ट्रवादीत घरवापसी करावी अशी आम्ही विनंती केली. तसेच त्यांना राष्ट्रवादीत परत आणण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याची खळबळजनक माहिती विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आज (दि.०२) पत्रकारांशी बोलताना दिली.
‘फ्रेंडशिप डे’चं औचित्य साधत पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह जुन्या मित्रांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्याबाबत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी खळबळजनक माहिती दिलीयं.
स्पष्टीकरण देताना राजू मिसाळ म्हणाले की, आमचा व्हायरल झालेला व्हिडिओ जुना आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मुलीच्या लग्न समारंभातील तो डान्स होता. आमची मैत्री राजकारणा पलिकडची आहे. शहराच्या राजकारणात अशा प्रकारच्या मैत्रीचा पुर्वीपासून वारसा आहे. पूर्वी एकाच पक्षात असलेले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे. महेश लांडगे, प्रशांत शितोळे, राजेश पिल्ले, शांताराम भालेकर, उल्हास शेट्टी आम्ही जुने मित्र आहोत. काल ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने आम्ही भेटलो. एकत्र आलो, दिलखुलास गप्पा मारल्या.
आज आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी, पूर्वी एकाच पक्षात होतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करत होतो. मात्र कालांतराने महेशदादा आणि इतर मित्रांना राष्ट्रवादीतून भाजपात जावे लागले. सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शहरात काम करायचे असेल तर राज्याची नक्कीच मदत हवी असते. अजितदादांच्या कामाचा धडाका महेश लांडगे चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वात पुन्हा आल्यास शहरात काम करताना कोणतीच अडचण येणार नाही. म्हणूनच महेशदादांनी घरवापसी करावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. महेशदादा परत या.. असे साकडे घातले आणि यापुढेही प्रयत्न करत राहणार असल्याचे राजू मिसाळ यांनी शेवटी बोलताना सांगितले.