पिंपरी (Pclive7.com):- शरद पवार यांच्या आवाजाचा वापर करून प्रतापराव वामन खांडेभराड यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या चाकण मध्ये घडला आहे. या प्रकरणी खांडेभराड यांनी चाकण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. धीरज धनाजी पठारे असं मुख्य आरोपीचे नाव आहे.
त्याचे साथीदार गुरव यांने शरद पवार यांचा आवाज काढून खांडेभराड यांना पैशाची मागणी केली होती. त्यांना किरण काकडे याची ही साथ मिळाली होती. खांडेभराड यांनी 2014 ला धीरज पठारे यांच्या कडून 1 कोटी 20 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यासाठी खांडेभराड यांनी पठारे यांना 13 एकर जमीन ही दिली होती. मात्र चक्रवाढ व्याज लावल्याने रक्कम वाढतच होती. त्यातच जमिनीचा व्यवहार होत नाही असे कारण सांगून पठारेने पुन्हा जानेवारी पासून पैशांची मागणी केली.
पैसे देत नाही म्हणून पठारे याने साथीदारांच्या मदतीने संगणक आणि इंटरनेटचा वापर करत थेट शरद पवार यांच्या घरचा नंबर इंटरनेट फोनसाठी वापरला आणि खांडेभराड यांच्याकडे पैशांची मागणी केली. इंटरनेटचा वापर झाल्याने मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. त्यांना 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुबंईनंतर खांडेभराड हे चाकण मध्ये राहत असल्याने आरोपी विरोधात चाकणमध्ये ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आरोपींची चौकशी करणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे.