पिंपरी (Pclive7.com):- कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने किऑस (टोकन मशीन) पद्धती सुरू केली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु दापोडी, फुगेवाडी येथील नागरिकांना टोकन काढण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे. त्यामुळे दापोडी, फुगेवाडी दवाखान्यात टोकन मशीन बसविण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
युवा सेनेचे पिंपरी विधानसभा अधिकारी नीलेश हाके यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दापोडी, फुगेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर कामगार व मध्यवर्गीय नागरिक वास्तव्यास आहेत. महापालिकेने कोविड लसीकरण करण्यासाठी टोकन पद्धती सुरू केली आहे.
नागरिकांनी लस घेण्यापूर्वी आपल्या नाव नोंदणी करून टोकन काढणे गरजेचे आहे. त्यात दिलेल्या तारखेला आणि वेळेला जाऊन लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस घेण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. तसेच नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यापासून सुटका मिळाली आहे.
परंतु दापोडी आणि फुगेवाडी येथील नागरिकांना टोकन काढण्यासाठी कासारवाडी येथे जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा वेळ आणि पैसा जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दापोडी आणि फुगेवाडी येथील दवाखान्यांमध्ये टोकन मशीन बसवावे, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.