पिंपरी (Pclive7.com):- मोशी बनकरवस्ती येथे असलेल्या विद्युत रोहित्राची दुरावस्था झाल्याने या धोकादायक रोहित्रामुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत होते. अनेकदा पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थे होती. दरम्यान नागरिकांनी याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या ‘परिवर्तन हेल्पलाईन’वर तक्रार दिली असता तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली. यामुळे अपघाताचा धोका टळला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बनकरवस्ती परिसरात असलेले विद्युत रोहित्र अत्यंत धोकादायक बनले असल्याने ते इतरत्र हलविण्याची मागणी करण्यात येत होती. पावसाळ्यात या रोहित्रामधून धोकादायक पद्धतीने जाळ निघत असतो. रोहित्राला पानवेलींचा वेढा पडला असून मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते.
यामुळे अपघाताच्या धोक्यासह दुर्गंधी आणि अस्वछताही निर्माण झाली होती. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचाही धोका निर्माण झाला होता. याठिकाणी लहान मुले खेळत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता होती. थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याने नागरिकांकडून तात्काळ उपायोजना, स्वच्छता किंवा रोहित्र इतरत्र हलवण्याची मागणी होत होती.
याबाबत स्थनिक नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा केला होता. मात्र परिस्थिती जैसे थे होती. तसेच पावसाळा सुरु असल्याने तात्काळ उपायोजना अत्यावश्यक होती. दरम्यान नागरिकांनी आमदार महेश लांडगे संचलित परिवर्तन हेल्पलाईनवर संपर्क केला.
याबाबत हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी पूर्ण माहिती घेतली तसेच स्वयंसेवकांनी घटनस्थानी पाहणी केली. त्यानंतर तात्काळ परिसरात स्वच्छता करण्यात आली. तसेच रोहित्राची दुरुती करून भविष्यात दुर्घटना होणार नाही याबाबतही उपपयोजना करण्यात आली आहे. हेल्पलाइनवर संपर्क करताच तात्काळ कार्यवाही झाल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.