पिंपरी (Pclive7.com):- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन वेबिनार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मानसोपचार तज्ञ व मनाची व्यायाम शाळा या उपक्रमाचे प्रणेते डॉक्टर राजीव नगरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांनी सध्याच्या कोरोना साथीच्या काळात मानसिक स्वास्थ्य कसे टिकवले पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी वेबिनारच्या सुरुवातीस महापालिकेमार्फत ज्येष्ठांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत मुथियान व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे चिटणीस हरी शेळके यांनी सहभाग घेत ज्येष्ठांविषयी विविध विषयांवर संवाद साधला.
याच कार्यक्रमामध्ये ज्येष्ठांसाठी एका अनोख्या ऑनलाईन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ‘माझ्या आठवणीतले पिंपरी-चिंचवड’ या विषयावर जेष्ठ नागरिकांनी दोन ते तीन मिनिटांत पूर्वीचे पिंपरी-चिंचवड कसे होते यासंदर्भात अनुभव मांडायचे आहेत. शहराचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये कसा बदल झाला यावर व्हिडीओच्या माध्यमातून मनमोकळेपणाने संवाद साधायचा आहे.
नागरिकांना ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ मोबाईल ॲपवर पोल/सर्वे या टॅबवर क्लिक करून स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व माहिती भरून मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. याबद्दल काही मदत लागल्यास आमच्या 9607014391 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. परीक्षकांमार्फत अशा सर्व अनुभव कथन व्हिडिओंचे परीक्षण करून विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्यांचा नागरवस्ती विभागाकडून सन्मान करण्यात येईल.