पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा एक वर्षाचा कार्यकाल पुर्ण होत असल्याबदल पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) मानिनी महिला मंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती मानिनी महिला मंडळाच्या संस्थापक शंकुतलाबाई खरात – कदम आणि अध्यक्षा सुवर्णाताई राहुल डंबाळे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. यावेळी आयुक्त कृष्णप्रकाश यांची सिने अभिनेत्री नयन गळुंजकर या प्रकट मुलाखत घेणार आहेत.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, कामगार नेते बाबा कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे, उद्योजक श्रीकांत बडवे आदी उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा रविवारी 5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी एक वर्षाचा कार्यकाल पुर्ण होत आहे. या कार्यकालात त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली येथिल पोलिस प्रशासन गतीशिल आणि कृतीशिल झाल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले.
आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या कार्यकालात प्रत्यक्ष फिल्डवर येऊन नागरीकांशी सुसंवाद साधत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लक्षणिय काम केले. त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे समाजात ‘पोलिसांची प्रतिमा’ उंचावली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील युवती, महिला भगिनी देखिल निर्भयपणे आपले काम करीत आहेत.
अशा धडाकेबाज पोलिस आयुक्तांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मानिनी महिला मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) संत तुकाराम नगर पिंपरी येथिल आचार्य अत्रे सभागृहात सायंकाळी 6 वाजता सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम प्रशासनाने कोरोना विषयी सांगितलेले सर्व नियम व अटींचे पालन करून घेण्यात येणार आहे. या सभागृहाच्या एकूण क्षमतेपेक्षा केवळ पन्नास टक्के आसन क्षमता उपयोगात आणली जाणार आहे. सर्व उपस्थितांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.