पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे-ताथवडे गावची हद्द रावेत पोलीस स्टेशनमध्ये समाविष्ठ करा, तसेच पुनावळे येथे स्वतंत्र पोलिस चौकी निर्माण करावी अशा मागणीचे निवेदन दोनही गावच्यावतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले आहे.
चेतन भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनावळे व ताथवडे या गावातील काही भाग हा वाकड पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. तसेच या दोन्ही गावांचा काही भाग हा हिंजवडी पोलीस ठाणे अंतर्गत येतो. त्यामुळे गावातील नागरिकांना अडी अडचणीसाठी दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ये-जा करावी लागते. तसेच हे दोन्ही पोलीस स्टेशन आणि या दोनही गावांच्या दुरच्या अंतरावर आहेत.
नव्याने निर्माण झालेले रावेत पोलीस स्टेशन हे पुनावळे व ताथवडे गावांच्या नजीकचे पोलीस स्टेशन आहे. ताथवडे व पुनावळे ही दोन्ही गावे रावेत पोलीस स्टेशनमध्ये समाविष्ट करावीत. तसेच पुनावळे येथे नवीन पोलीस चौकी निर्माण झाल्यास येथील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे.
त्यामुळे मौजे पुनावळे व ताथवडे येथील नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून ही दोन्ही गावे नव्याने निर्माण झालेल्या रावेत पोलीस स्टेशनमध्ये समाविष्ठ करावे. तसेच पुनावळे येथे स्वतंत्र पोलीस चौकी निर्माण करावी अशी मागणी चेतन भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.