पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील ८ वी ते १० चे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचे औक्षण करून शाळेत स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक, पॅड अशा शालेयपयोगी वस्तू भेट देण्यात आल्यात. पालकांचे संमती पत्र आणि कोरोना नियमांच्या अधीन राहून या शाळा सुरू झाल्या आहेत. तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले आहे.
राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता १२ वीपर्यंतचे वर्ग भरलेत. तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे.
त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील ८ ते १२ चे वर्ग सुरू झालेत. आज पहिलाच दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्यात मोठा उत्साह पहायला मिळाला. काळेवाडी येथील मराठवाडा मित्र मंडळाचे एम.एम.विद्यामंदीर येथे विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक, पॅड अशा शालेयपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. तत्पूर्वी शाळेमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे सॅनिटायझेशन आणि टेम्प्रेचर तपासण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेण्यात येत आले.
शहरात कोरोनासंदर्भातले नियम पाळले नाहीत, तर कठोर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरात तीन तास शाळा भरणार आहेत.