आयुक्तांच्या सांस्कृतिक कार्यक्रमावरील ‘बंदी’ आदेशानंतरही महापौर, उपमहापौरांनी धरला ठेका..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदीचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. मात्र त्यांच्या या आदेशाचा महापालिकेलाच विसर पडला आहे. पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे आज (दि.११) पहायला मिळाले.
गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदीचे आदेश असताना महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे आणि उपमहापौर नानी घुले यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत गाण्यावरती ठेका धरला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी नवरात्रोत्सव २०२१ बाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयुक्त राजेश पाटील यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, शहरामध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही.
तसेच दस-याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम कोरोना विषयक नियमांचे पालन करून करावा, रावण दहनाकरिता प्रेक्षक न बोलविता कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने दाखविण्याची व्यवस्था करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.
याबाबत महापौर माई ढोरे म्हणाल्या की, हा गरबाचा कार्यक्रम नव्हता. यात फक्त महापालिकेचे कर्मचारीच होते, कुठलीच गर्दी नव्हती. हौस म्हणून महिला कर्मचार्यांनी विनंती केली म्हणून दोन मिनिटं तिथे होतो. मास्क घालून श्वास घेता येत नाही, म्हणून मास्क थोडा वेळ काढला होता.
कोरोनाच्या काळात महापालिका कर्मचार्यांनी रात्रदिवस काम केले. कोरोना आटोक्यात आणला. आज महापालिकेचा ३९ वा वर्धापन दिन होता. मागिल कोरोनाचं जे वातावरण होतं, त्याला कुठतरी थोडं विसर पडला पाहिजे, कर्मचार्यांना विरंगुळा झाला पाहिजे त्यासाठी महापालिकेचा प्रयत्न होता असे त्या म्हणाल्या.