पिंपरी (Pclive7.com):- कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘बर्गमॅन’ ट्रायथलॉन स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील आयटीनगरी परिसरातील खेळाडूंनी यश संपादन केले आहे. वाकड येथील सचिन वाकडकर, पांडुरंग बोडके व हिंजवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी पहिल्याच प्रयत्नात अत्यंत खडतर तसेच आव्हानात्मक असलेल्या या स्पर्धेत बाजी मारत ‘बर्गमॅन’ किताब पटकावला आहे.
हाफ आयर्न मॅन स्पर्धा म्हणून प्रसिद्ध असलेल्या व दरवर्षी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत यावर्षी सहाशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत निर्धारित वेळेत धावणे, पोहणे व सायकलिंग या तीनही प्रकारात खेळाडूंना आपले कसब पणाला लावावे लागते.
या स्पर्धेत १.९ किलो मीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकल चालवणे आणि २१.१ किलो मीटर धावणे हे सर्व नऊ तासात पूर्ण करणे हे अंतिम आव्हान असते. या तिन्ही प्रकारांत निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत या तिन्ही खेळाडूंनी आपले लक्ष्य पूर्ण करत हे यश मिळवले. या तिन्ही खेळाडूंना स्पर्धेसाठी प्रशिक्षक वैभव ठोंबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पिंपरी चिंचवड नगरीतील सचिन वाकडकर, पांडुरंग बोडके, राम गोमारे या खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.