पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत एका महिलेकडून सव्वा पाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. माया दिलीप रणदिवे (वय ४५, रा. पिंपरी रेल्वे स्थानकाशेजारी, भारतनगर , पिंपरी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
या महिलेकडे ब्राऊन शुगर असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पिंपरीतील गुरुदत्त नगर येथील उड्डाण पुलाखाली सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता तिच्याकडे १०५ ग्रॅम वजनाची व पाच लाख २५ हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर सापडली.
तसेच त्याच्या विक्रीतून मिळालेली दोन हजारांची रोकडही तिच्याकडून जप्त करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या महिलेला अटक करण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहे.