पिंपरी (Pclive7.com):- श्री. नागेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी गावाचा आध्यात्मिक, सामाजिक इतिहास पुस्तक रूपाने मांडण्याचा संकल्पना पिंपरी चिंचवड शहरातील जाहिरात व प्रसिद्धी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रे क्रियेशन या संस्थेच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.
बांधकाम क्षेत्रातील सिल्वर ग्रुपच्या सहकार्याने पुण्यभूमी मोशी हे आकर्षक व ऐतिहासिक पुस्तक वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार दि. 9 मे 2022 रोजी मोशी येथील हॉटल मोशी ग्रँड येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यभूमी मोशी या पुस्तकाचे प्रकाशन भोसरीचे आमदार भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे, सिल्वर ग्रुपचे डायरेक्टर संतोष बारणे, प्रसिद्ध लेखक डॉ. प्रकाश कोयाडे, राज्यशासन पुरस्कार प्राप्त लेखक नितीन थोरात या मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यासंदर्भात पुस्तकाचे संपादक अविनाश आदक यांनी सांगितले की, सुमारे दोन वर्षांपूर्वी मोशी गावाचा इतिहास पुस्तकरूपाने मांडण्याचा संकल्प करण्यात आला. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आमच्या टीमने अथक परिश्रम घेतले.
नागेश्वर महाराजांचा व मोशी गावाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही असंख्य ग्रामस्थांना भेटलो.. माहिती घेतली, त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये मोशी गावाचा झपाट्याने होत असलेला विकास व त्यासंबंधी माहिती आम्ही जमविली, या पुस्तकाच्या निर्मितीसाठी सिल्वर ग्रुपच्या संतोष बारणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर मोशीतील स्वीकृत नगरसेवक सागर हिंगणे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास आल्हाट, उद्योजक चंद्रकांत तापकीर, युवा नेते मंगेश हिंगणे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, राजेश सस्ते, शिवाजी आल्हाट, वंदना आल्हाट, बांधकाम व्यवसायिक विजय रासकर आदी मान्यवरांचे मोलाचे पाठबळ लाभले.
या सर्वांच्या सहकार्याने हे ऐतिहासिक पुण्यभूमी मोशी हे पुस्तक साकारण्यात आले आहे. सोमवारी आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी रे क्रियेशन आणि सिल्वर ग्रुपच्या वतीने सर्व नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.