पिंपरी (Pclive7.com):- पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार घेतली नाही, असे गार्हाणे काही नागरिकांकडून करण्यात येते. अशा नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एक व्हॉट्स ॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्यास थेट व्हॉट्स अप करा, असे आवाहनही आयुक्त शिंदे यांनी केले आहे. याबाबत सर्व पोलीस ठाण्यात मोबाइल क्रमांकांचे फलक लावले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अंकुश शिंदे हे पोलीस ठाण्यांना भेट देत गुन्ह्यांचा आढावा घेतला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच, यापुढे लाचलुचपत विभागाने छापा मारल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्याला (विभागप्रमुख) जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही आयुक्तांनी दिली आहे. त्यानंतर व्हॉट्स ॲप क्रमांक जाहीर प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल क्रमांक नमूद असलेला फलक देखील लावला आहे. त्यामुळे आता स्थानिक पोलिसांनी दाद न घेतल्यास तक्रारदारांना थेट पोलीस आयुक्त कार्यालयात व्हॉट्स ॲप मेसेजवरून तक्रार मांडता येणार आहे.
… हा आहे ‘व्हॉट्स ॲप क्रमांकपोलीस स्टेशन येथे जर आपली तक्रार घेतली नाही, तर सदरची तक्रार ९३०७९४५१८२ या नंबरवर व्हॉटस ॲपद्वारे करावी, असे पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आलेल्या फलकांवर नमूद आहे. व्हॉट्सॲप वरील या तक्रारीची दखल सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. तक्रारीची शहानिशा करून स्थानिक पोलिसांना याबाबत विचारणा होणार आहे. तसेच तक्रारदाराचे समाधान करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त कार्यालयातून होणार आहे.