देहूगाव (Pclive7.com):- देहूगाव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३७ व्या पालखी सोहळ्याच्या प्राथमिक तयारीला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सुरुवात झाली आहे. हा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी म्हणजेच २० जून रोजी प्रथेप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळा देहूतून निघाल्यावर २१ जूनला पालखी पिंपरीत दाखल होईल. ती २२ जूनला पुण्यात पोहचणार आहे. याबाबत पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी माहिती दिली.
पालखीला सव्वा महिना राहिला असताना श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने असा असेल यंदाचा आषाढीवारी पालखी सोहळा कार्यक्रम प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी पालखी मुक्कामाच्या काही जागेच्या संदर्भात अडचणी होत्या. त्या अडचणी चर्चेतून सोडविल्या आहेत. त्यानंतर पालखीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उरुळी कांचन, भांडगाव व बऱ्हाणपूर या ठिकाणी जागेची कमतरता आहे. तेथील भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन तसेच पालखीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी पालखीचा विसावा रस्त्यालगत घेतला. पालखी मुक्काम व विसाव्याच्या जागा निश्चित झाल्या आहेत. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे आदी उपस्थित होते.
प्रथेप्रमाणे बेलवडीत गोल रिंगण
या पालखी सोहळ्याच्या दरम्यान प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होणार आहे. इंदापूर, अकलूज येथील माने विद्यालयजवळ व माळीनगर येथे उभे रिंगण तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि चाखरीवर भाविकांना उभे रिंगण पहायला मिळणार आहे.
परतीच्या प्रवासातही पुण्यात दोन मुक्काम
१) १३ जुलैला पालखी दुपारी पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. पहिला मुक्काम वाखरी येथे राहील.
२) या वर्षी पालखीच्या विसाव्यांच्या जागेत काहीसा बदल करण्यात आला आहे. उरुळी कांचन फाटा, भांडगाव फाटा व बहाणपूर फाटा या ठिकाणी पालखी दुपारच्या विसाव्याला थांबणार आहेत. इंदापूर येथे पालखीचे दोन मुक्काम असणार आहेत.
३) हडपसर येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे. पालखी उरुळी कांचन येथून थेट पुण्यात नवीपेठ विठ्ठल मंदिरात विसावणार आहे. परतीच्या प्रवासातही पुण्यात पालखीचे दोन मुक्काम होणार आहे.
असा असेल यंदाचा आषाढीवारी पालखी सोहळा कार्यक्रम
■ २० जून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान व पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव इनामदार वाड्यात होईल.
■ २१ जून आकुर्डी विठ्ठल मंदिर,
■ २२ आणि २३ जून नानापेठ येथील श्री निवडुंगा श्री विठ्ठल मंदिर पुणे.
■ २४ जून लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर,
■ २५ जून यवत
■ २६ जून वरखंड.
■ २७ जून उंडवडी गवळ्याची.
■ २८ जून बारामती शारदा विद्यालय,
■ २९ जून सणसर
■ ३० जून बेलवडी येथे गोल रिंगण, आंथुर्णे येथे मुक्काम,
■ १ जुलै निमगाव केतकी,
■ २ जुलै इंदापूर येथे गोल रिंगण आणि मुक्काम.
■ ३ जुलै पालखी इंदापूर येथे संपूर्ण दिवस मुक्कामी असणार आहे.
■ ४ जुलै सराटी.
■ ५ जुलै माने विद्यालय येथे गोल रिंगण आणि मुक्काम अकलूज.
■ ६ जुलै माळीनगर येथे उभे रिंगण, बोरगाव,
■ ७ जुलै तोडले बोंडले येथे धावा, मुक्काम पिराची कुरोली.
■ ८ जुलै बाजीराव विहीर येथे उभे रिंगण वाखरी तळावर मुक्काम.
■ ९ जुलै पालखी दुपारी एक वाजल्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून वाखरी येथे पादुका आरती व उभे रिंगण होईल. यानंतर रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्काम पोहचणार आहे.
■ १० जुलै एकादशीच्या दिवशी नगरप्रदक्षिणा करून पालखी १३ जुलै दुपारी एक वाजेपर्यंत येथे मुक्कामी राहणार आहे.