गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. या आल्हाददायक वातावरणात सिंहगड तसेच गड किल्ल्यांवर पर्यटक भटकंतीसाठी गर्दी करतात. मात्र, पावसाच्या जोरामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. रविवारी दुपारी सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळ्याची घटना घडली होती. त्यामुळे दिड तास घाट रस्ता बंद ठेवण्यात आला होता. पोलीस आणि वनविभागाने हा रस्ता पुर्ववत केल्यानंतर घाट रस्ता सुरू करण्यात आला होता.वनविभागाने त्यानंतर परिसरातील धोकादायक दरडीबाबात माहिती घेतली. काही धोकादायक दरडी कोसळण्याची भिती असल्याने त्या काढण्याचे काम वनविभागाने सोमवारी जाहीर केले. धोकादायक दरडी काढण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वनविभागाने सिंहगड पर्यटकांसाठी ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.