पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीनुसार होणार असून, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. निवडणुकीसाठी १३९ नगरसेवक संख्या आहे. ४६ प्रभाग राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी २२ तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव आहेत. ११४ जागा सर्वसाधारण गटासाठी असतील. लोकसंख्या सूत्रानुसार पिंपळेगुरवला अनुसूचित जमातींचे दोन वॉर्ड राखीव झाले आहेत. तर अनेक प्रभागांत एससी आणि एसटीचे आरक्षण आले आहे. तर बोपखेल, पिंपळेगुरव प्रभागात खुल्या वर्गातील इच्छुकांमध्ये चुरस होणार आहे.
महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यानुसार प्रभागांचे प्रारूप अंतिम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ असेल, तर अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे.
असे आहेत एससीचे आरक्षण
आरक्षणाच्या सूत्रानुसार २२ प्रभाग एससीचे असणार आहेत: प्रभाग क्रमांक २९ भाटनगर- मिलिंदनगर, प्रभाग क्रमांक १९ चिचवड स्टेशन दत्तनगर मोहननगर, प्रभाग क्रमांक २२ ओटास्कीम निगडीगावठाण, प्रभाग क्रमांक २० काळभोरनगर- रामनगर विद्यानगर, प्रभाग क्रमांक ४३ दापोड़ी- गणेशनगर, प्रभाग क्रमांक ११ इंद्रायणीनगर बालाजीनगर, प्रभाग क्रमांक २४ मामुर्डी- किवळे- रावेत, प्रभाग क्रमांक १८ मोरवाडी मासुळकर कॉलनी गांधीनगर, प्रभाग क्रमांक ४६ जुनी सांगवी ममतानगर, प्रभाग क्रमांक ३७ ताथवडे पुनावळे काळाखड़क, प्रभाग क्रमांक ४४ पिंपळेगुरव राजीव गांधीनगर, प्रभाग क्रमांक १६ नेहरूनगर- विठ्ठलनगर, प्रभाग क्रमांक ३४ बापूजीबुवानगर अशोका सोसायटी, प्रभाग क्रमांक ३९ पिपळेनिलख- वेणूनगर कावेरीनगर, प्रभाग क्रमांक ३५ थेरगाव-बेलठीकानगर, प्रभाग क्रमांक २५ वाल्हेकरवाडी- गुरुद्वारा, प्रभाग क्रमांक ६ दिघी बोपखेलगावठाण, प्रभाग क्रमांक १७ वल्लभनगर एच ए कॉलनी- संत तुकारामनगर, प्रभाग क्रमांक ३३ रहाटणी, प्रभाग क्रमांक १४ यमुनानगर- कृष्णानगर त्रिवेणीनगर, प्रभाग क्रमांक ३ बोहाडेवाडी- जाधववाडी, प्रभाग क्रमांक ३२ तापकीरनगर जोतिबानगर हे प्रभाग एससीचे आरक्षित झाले आहेत.
विद्यमान नगरसेवकांना फटका
प्रभाग क्रमांक ६ दिघी बोपखेल आणि प्रभाग क्रमांक ४४ पिंपळेगुरव, राजीव गांधीनगर या प्रभागातील तीनपैकी दोन जागा एससी आणि एसटीसाठी राखीव राहतील. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी दोनही प्रभागात एकच जागा राहत आहे. या प्रभागांमध्ये भाजपाचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यमान नगरसेवकांची गोची होणार आहे. विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर ठाकणार आहेत.