आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाची विविध कामे होऊन सज्ज झालेला दिसून येत आहे. पांडुरंग वरखडे यांची सोन्या-माऊली ह्या बैलजोडीने आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ ओढण्याचा सराव केला. २१ जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे.
पुढील काही दिवसांचाच काय तो कालावधी शिल्लक राहिल्याने पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्यात आली आहे. आज रथाला बैलजोडी जुंपण्यात आली आणि रथाची ५ ते ६ किलोमीटरची ट्रायल देखील घेण्यात आली.
दोन वर्ष वारी न झाल्याने ह्या रथाची क्लिनिंग, ब्रेक लाइनर तसेच या रथामधील लाईट तसेच सीसीटीव्ही कॅमेरे रथाला पॉलिश करण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झाले आहे. रथाची संपूर्ण डागडुजी करण्यात आली आहे. रथाला पूर्वी ट्रॅक्टरचे साधे ब्रेक होते. आता पॉवर ब्रेक लावण्यात आले आहेत. रंगरंगोटीही करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे देखील सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.
ह्या विविध कामांमुळे हा रथ उजळून निघाला असून झालेल्या कामामुळे रथाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. सराव करते वेळी रथाची पाहणी करून दुरुस्तीसाठी कारागीरही आळंदी मधील संस्थांनच्या भक्त निवासामध्ये कार्यरत आहेत.