पुणे (प्रतिनिधी):- पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पत्राने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या पासची किंमत वाढवून मनमानी करू नका, अन्यथा संपवून टाकू, अशा आशयाचे पत्र मुंढे यांच्या कार्यालयात दुपारी प्राप्त झाले. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएमपीची सूत्रे हातात घेतल्यापासून मुंढे यांनी गाळात चाललेल्या पीएमपीसंदर्भात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या पासची किंमत ४०० रुपयांवरून ७०० रुपये केली. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. त्यामुळेच चिडून जाऊन हे धमकीचे पत्र लिहील्याचे दिसत आहे. पत्राच्या शेवटी भुजंगराव पाटील या नावाचा उल्लेख असून पत्रात अश्लील, घाणेरडी भाषाही वापरण्यात आली आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या पासची किंमत मनमानीपणे कशी वाढवू शकता, असे निर्णय घेऊन तुम्ही वाद ओढवून घेत आहात, कामाची ही पद्धत बरी नाही असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच आम्ही नक्षलवादी चळवळीच्या संपर्कात असून तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोदविण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार यांनी दिली. पत्रातील नाव हे बनावट असल्याचा संशय असून याबाबत सखोल तपास करण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. दरम्यान, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे पत्र आले असून पीएमपीमध्ये करत असलेल्या विविध सुधारणांना या पत्रातून विरोध करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी हे पत्र स्वारगेट पोलिसांकडे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.