पिंपरी (Pclive7.com):- नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट कस्टमर केअर सेंटर चालवून मुंबई, अहमदाबाद व पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांची फसवणूक करून पैसे उकळणारे रॅकेट हिंजवडी पोलीस व गुन्हे शाखा चारच्या पथकाने उध्वस्त केल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी आज (दि.०३) पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात पाच जणांना अटक झाली असून एकूण १ लाख १४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
रफिउद्दीन उर्फ रफिक अब्दुल ललित चौधरी (वय २८, रा. जाधववाडी चिखली, उत्तरप्रदेश), मोहम्मद फिरोज मो. अब्दुल (वय २१, रा. पवार वस्ती, दापोडी, मुळ- उत्तरप्रदेश), अशोक कुमार धुकाराम माली (वय ३१), जयप्रकाश धुकाराम माली (वय २७), पारसकुमार गोराराम माली (वय २१, तीघेही राहणार- पिंपरी पाडा मालाड ईस्ट, मुंबई. मुळ- राज्यस्थान) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एक महिला व तीन अल्पवयीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अरुण गुलाब डुंबरे (वय ४३, रा. ए१/५०५, यशवीन इनकोर, वाकड) यांनी गुन्हे शाखा युनिट चारकडे तक्रार दिली होती.
डुंबरे यांच्या घरातील खराब झालेल्या व्हर्लपुल कंपनीचे रेफ्रिजरेटरच्या दुरुस्तीसाठी गुगलवर सर्च केल्यावर व्हर्लपुल कस्टमर केअर नावाने असलेल्या एक टोल फ्री क्रमांकावर त्यांनी कॉल केला. त्या कॉलवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तो व्हर्लपुल कस्टमर केअरमधून बोलत असल्याचा बनाव केला. फिर्यादीच्या घरी रफिक व फिरोज नावाचे दोन इसम पाठवून त्यांनीसुद्धा ते अधिकृत व्हर्लपुलचे प्रतिनिधी असल्याचे भासवले. तसेच, त्यांनी फिर्यादीच्या घरातील रेफ्रिजरेटरच्या दुरुस्तीचे काम केल्याचा बनाव करून फिर्यादीकडून ३२५० रुपये इतकी रक्कम घेऊन एका ऑनलाईन ऍपद्वारे खोटे व बनावट इनव्हाईस देवून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.
त्यावरून रफिउद्दीन चौधरी व मोहम्मद फिरोज अब्दुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी २८ जुलैला आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडे तपास केल्यानंतर बनावट कस्टमर केअर सेंटर मुंबईमध्ये चालवले जात असल्याची माहिती मिळाली. या बनावट कस्टमर केअर व त्यांच्या मास्टरमाईंडचा शोध लावण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस उप निरीक्षक महेंद्र गाढवे हे तपास टीम सोबत रफिकला घेऊन मालाड मुंबईला गेले. तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने पिंपरी पाडा झोपडपट्टीमध्ये शोध घेऊन झी २४ x ७ कस्टमर केअरवर छापा टाकण्यात आला.
सेंटरमध्ये काम करणाऱ्या ४ मुली व दोन पुरुषांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली ७ अँड्रॉइड मोबाईल तसेच १७ छोटे मोबाईल व वेगवेगळ्या नोंद वह्या, रजिस्टर, व कॉम्पुटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सात मोबाईल हे टोल फ्री क्रमांक असलेले मिळाले आहेत. यातील आरोपी अशोककुमार माली हा कस्टमर केअर मालक असुन जयप्रकाश माली हा कस्टमर केअर सेंटर चालवायचा तर पारसकुमार गौराराम माली हा कस्टमर केअर ऑफिसमध्ये कामास आहे.
अशी फसवणूक होत होती..
नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट कस्टमर केअर सेंटर स्थापन करून तसेच नामांकित कंपन्यांच्या नावाचे कस्टमर केअर सेंटरची गुगलवर जाहीरात व टोल फ्री नंबर देऊन फोन करणाऱ्या ग्राहकांना खऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला कॉल लागल्याचा बनाव करून माहीती घेत व नंतर कोणतेही ट्रेनींग, कोर्स न झालेला टेक्नीशयन कस्टमरच्या घरी पाठवुन पार्ट बदलायच्या नावाखाली पैसे उकळायचे
नागरिकांना पोलिसांचे आवाहन..
हिंजवडी पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारे व्हॅलफुल, सॅमसंग, गोदरेज, एलजी इत्यादी कंपन्यांच्या नावाने बनावट कस्टमर केअर सेंटर त्यांचे टोल फ्री क्रमांक १८००८४३३००८, १८००४१७८०८३, १८००४१९४८४७, १८००४१०८०८३, १८००४१५८६८३, १८००१०३८४४१ या टोल फ्री क्रमांकावरून कोणाची फसवणूक झाली असल्यास तात्काळ हिंजवडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्र गाढवे (मोबाइल नं. ९५१८५१०३९३) यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.