पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला, सुका कचरा वर्गीकरणाच्या नावाखाली उचलणे बंद केले आहे.ही खूप गंभीर बाब असून कचरा उचला जात नसल्यामुळे सोसायटी परिसरात दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इंदोर पॅटर्नच्या नावाखाली कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठीचा भुर्दंड सोसायट्यांना का? असा सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.
याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात नाना काटे यांनी म्हटले आहे की, रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील सर्व सोसायट्यांमधील ओला सुका कचरा काही दिवसांपूर्वी नोटीस देवून कचरा वर्गीकरणाच्या नावाखाली दैनंदिन कचरा उचलणे बंद केले आहे. या परिसरात २० हजार सदनिका आहेत. येथील नागरिक लाखो रुपये कर रूपाने महापालिकेला देतात. त्यामुळे सोसायट्यांना मुलभूत सुविधा पुरवणे हे देखील महापालिकेचे कर्तव्य आहे. तरी इंदोर पॅटर्नच्या नावाखाली कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी हा भुर्दंड सोसायट्यांना का? या भागात काही सोसायट्या या खूप छोट्या आहेत.
आरोग्य विभागाच्या नोटीसीप्रमाणे ओला कचरा १०० किलोच्या वर असेल तर तो उचलला जाणार नाही. परंतु बहुतेक सोसायटी मध्ये १०० किलो एवढा ओला कचरा तयार होत नाही. तरी, देखील त्यांचा कचरा हा उचलला जात नाही. सोसायट्यांना ओला सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी लागणारी पुरेशी जागा उपलब्ध नाही. काही सोसायटी मध्ये हा कचरा वर्गीकरण प्रकल्प करण्यास तयार नाहीत. तरी, त्यांचावर या प्रकल्पासाठी दबाव का? एखाद्या प्रकल्पासाठी नागरिकांना वेठीस धरू नये. त्यासाठी जबरदस्ती करू नये.
दैनंदिन कचरा न उचलणे ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. तरी कचरा उचलला गेला पाहिजे. रहाटणी, पिंपळे-सौदागर हा प्रभाग संपूर्ण शहरातील स्मार्ट सिटी प्रभाग म्हणून ओळखला जातो. याचा विचार करता महापालिकेच्या वतीने या प्रभागासाठी एक ओला सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प राबवावा. या समस्येवर योग तोडगा निघे पर्यंत परिसरातील ओला सुका कचरा दररोज उचलण्यात यावा अशा सूचना संबंधित आरोग्य विभागाला देण्यात याव्यात अशी मागणी नाना काटे यांनी केली.