पिंपरी (Pclive7.com):- घोडेगाव-भीमाशंकर रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात भिवंडीतील भाविकांना दर्शनासाठी घेऊन निघालेल्या भाविकांच्या बसला आज बुधवारी सकाळी अचानक आग लागली. बसमधील प्रवासी आणि चालक तत्परतेने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आगीत प्रवाशांचे साहित्य तसेच बस भस्मसात झाली.
ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी परिसरातील पाया गावातील २७ भाविक दर्शनासाठी भीमाशंकर येथे निघाले होते. बसचालक बाबू बसप्पा सूरपूर (वय ३०, रा. कल्याण, सोनारपाडा, जि. ठाणे ) यांनी तत्परतेने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. काही कळायच्या आत आग भडकली आणि बस पूर्णपणे जळाली.
बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. बसमधील प्रवाशांचे साहित्य जळाले, असे सहायक फौजदार नवनाथ वायाळ यांनी सांगितले. बसला आग नेमकी कशी लागली, यामागचे निश्चित कारण शकले नाही. या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.