आळंदी (Pclive7.com : प्रसाद बोराटे):- श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७२६ वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेला सकाळी दि.१७ पासून श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास माऊलींच्या समाधी मंदिरापुढील श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
महाद्वारात पायरी पूजनासाठी भाविकांची गर्दी झाली. यावेळी महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत ब्रह्मवृदांचा विधिवत अखंड मंत्रोच्चार झाला. साथीला वारकऱ्यांचा माऊली नामाचा अखंड जयघोष सुरु होता. श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफाळकर, ऋषीकेश आरफाळकर यांनी श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन केले. श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पुजेचे पौरोहित्य वेदमूर्ती विजय कुलकर्णी, अमोल गांधी यांनी केले. यानंतर माऊलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी देवस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील, राहूल चिताळकर पाटील, स्वपिल कुऱ्हाडे पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, राष्ट्रवादीचे नेते डी.डी. भोसले पाटील, नंदकुमार वडगांवकर, सुदीप गरुड, विठ्ठल घुंडरे, आरू आदी मान्यवर व वारकरी भाविक, आळंदी ग्रामस्थकर उपस्थित होते.