पिंपरी (Pclive7.com):- बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्ये विकसित करून समाज व राज्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. स्वयंरोजगाराच्या कौशल्यातूनच व्यवसाय निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी रविवारी (दि.४) केले.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप, प्रतिभा महिला प्रतिष्ठान तसेच राज्याचा कौशल्य-रोजगार-उद्योजकता-नाविन् यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील द न्यू मिलेनिअमय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले.
यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त सागर मोहिते, माजी महापौर नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका सविता खुळे, अश्विनी चिंचवडे, उषा मुंढे, आरती चोंधे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, संगीता भोंडवे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सांगर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, विभीषण चौधरी, संदीप गाडे, गोपाळ माळेकर, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, युवकचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रमोद ताम्हणकर, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, आदी उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून गेले काही दिवस सातत्याने विविध राज्यांमध्ये ठिकठिकाणी रोजगार मेळावे भरवले जात आहेत. त्यातून केंद्र सरकार देशातील हजारो युवकांना रोजगार मिळवून देत आहे. बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराच्या विविध संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्ये विकसित करून समाज व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे.
पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा त्याच उद्देशाने आयोजित केले आहे. उद्योगांना रोजगारक्षम युवा मिळत नाही, तर युवकांना अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळत नाही अशा दोन्ही घटकांना या विभागीय रोजगार मेळाव्यातून एकत्र आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भारताची प्रतिमा तरुणांचा देश अशी आहे. या तरूण मनुष्यबळाला कौशल्य विकासाची जोड देऊन भारताच्या सकळ राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षित तांत्रिक व कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या युवकांना रोजगाराच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक तरूणाने तांत्रिक शिक्षण घेऊन कौशल्ययुक्त होणे काळाजी गरज आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच रोजगार मेळाव्यातून नोकरीची हमी मिळाली नाही तर नाराज न होता स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा घेऊन जावे, असे आवाहनही त्यांनी तरुणी-तरूणींना केले.”
यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप यांनीही बेरोजगार तरूणांना मार्गदर्शन केले.