पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केले आहे. जगताप हे पक्षप्रमुख शरद पवार अथवा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज होऊन भाजपामध्ये गेले नव्हते. त्यांचे या शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध करावी, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमदार बनसोडे म्हणाले, लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केल आहे. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, विधानपरिषद आमदार अशी विविध पद त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सांभाळली. दरम्यान, जगताप यांचे सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. अंत्यविधीला मोठा जनसागर लोटला होता. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांमध्ये जगताप परिवाराबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे.