(संदेश पुजारी – pclive7.com):- विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची विधानसभेत तरी परिस्थिती सुधारणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. खासकरून चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणाला उतरवणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा खरं तर आमदार लक्ष्मण जगताप यांचा, पर्यायाने आता भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडे तेवढा सक्षम उमेदवार नाही, ही वस्तुस्तिथी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे चिंचवडच्या उमेदवारीचे मोठे आव्हान असणार आहे. जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जी नावे पुढे येतात त्यात नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पण नाना काटे यांचे पिंपळे सौदागर आणि परिसर वगळता इतर भागात म्हणावे तसे वजन दिसून येत नाही. किंबहुना संपूर्ण मतदार संघाचा चेहरा म्हणून ते ओळखले जात नाहीत. राष्ट्रवादीकडून चिंचवडसाठी येणारे दुसरे नाव म्हणजे भाऊसाहेब भोईर यांचे आहे. शहरातील ज्येष्ठ नेते म्हणून ते नक्कीच परिचित आहेत. परंतू महापालिका निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना किती यश येऊ शकते हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे.
राष्ट्रवादीकडून इतर येणारी नावे जगताप यांच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहेत. जगताप यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची क्षमता चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यात नाही हे उघड सत्य आहे. परंतू लक्ष्मण जगताप यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र भाजपाकडेही जगताप यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नाही ही वस्तुस्थिती आहे. चिंचवडमध्ये जगताप हे स्वतः विधानसभेचे उमेदवार असले तरच भाजपासाठी चिंचवडचा मार्ग सुकर ठरणार आहे. पण जगताप उमेदवार नसतील तर भाजपाला ही उमेदवारीचा प्रश्न पडू शकतो. पण किमान त्या उमेदवाराला जगताप यांचा पाठिंबा मिळणार असल्याने त्याचे पारडे थोडे जडच असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी चिंचवड विधानसभा उमेदवारी आणि निवडणूक दोन्ही ही सोपी नाही हे खरे..!