पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज श्री मंगलमूर्तीची माघी रथयात्रा रविवार (दि.२२) पासून सुरु होणार आहे. १ फेब्रुवारीला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
चिंचवड येथील श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज हे दरमहा श्री मयुरेश्वराच्या दर्शनास जात असत. श्री मोरया गोसावी महाराजांना वयाच्या ११७ व्या वर्षी सन १४८९ मध्ये मयूरेश्वराची तांदळा मूर्ती मोरगाव येथील गणेश कुंडात प्राप्त झाली. वार्धक्यामुळे श्री महान मोरया गोसावी दरमहा न जाता फक्त माघ व भाद्रपद महिन्यात मोरगाव येथे जावू लागले. चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज श्री मंगलमूर्तीची प्रसादमुर्ती माघ महिन्यात रथातून पालखी मोरगाव येथे घेऊन जाण्याची ही परंपरा गेली सुमारे ५२५ वर्ष पेक्षा अधिक काळ अविरत सुरू आहे.
ही माघी रथयात्रा येत्या रविवारपासून (दि.२२) सुरू होत आहे. पालखी प्रस्थानाच्या निमित्त मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी दुपारी बारा वाजता पालखी प्रस्थान करणार आहे. मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवड लिंकरोड, जुना पुणे-मुंबई महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा मार्गे एकनाथ पालखीचा मंगल कार्यालयात मुकाम असेल. सोमवारी (दि.२३) पहाटे साडेचार वाजता भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कन्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल. पालखी मंगळवारी (दि. २४) सकाळी ६ वाजता मंदिरातून शिवरी रासकर महा श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, डोले या मार्गे मोरगाव येथे पालखी पोहचेल.
त्यानंतर बुधवार (दि. २५) आणि गुरुवारी (दि. २६) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. शुक्रवार (दि.२७) रोजी पालखी मोरगाव येथून जेजुरीकडे प्रस्थान करेल व मुक्काम जेजुरी येथे असेल. शनिवार (दि.२८) पालखीचा मुक्काम सासवड येथील कन्हाबाई मंदिरात असेल. रविवारी (दि. २९) पालखी सासवड येथून दिवे घाट, हडपसर, सोलापूररोड मार्गे पालखीचा मुक्काम थेऊर येथे असेल. सोमवारी (दि. ३०) पाटम, दौंड, शिरापूर मार्गे जाऊन सिद्धटेक येथे मुक्काम असेल.