पिंपरी (Pclive7.com):- शेतकऱ्यांना देशोधडीला लावून भांडवलदारांना फायदेशीर ठरतील असे निर्बंध शेतीमालावर सेबीने लादल्यामुळे शेतमालाचे भाव पडले आहेत. हे निर्बंध ताबडतोब मागे घ्यावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. अशा मागणीचे पत्र शहर काँग्रेसच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी तहसीलदार यांना दिले.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, सेबीने (सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) भांडवलदारांचे हित डोळ्यापुढे ठेवून कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहू, हरभरा, तूर, मोहरी, हळद या शेतकऱ्यांच्या नगदी पिकांवर सौदे करण्यास वायदे बाजारात बंदी घातली आहे. यामुळे या शेतमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या बंदीमुळे प्रत्यक्ष या शेतमालावर प्रक्रिया उद्योग करणाऱ्या भांडवलदारांना तसेच संघटित टेक्स्टाईल, गारमेंट आणि खाद्यतेल उत्पादन करणाऱ्या लॉबिला फायदा होणार आहे.
हे निर्बंध ताबडतोब मागे घ्यावेत असे आदेश केंद्र सरकारने सेबीला द्यावेत अन्यथा पुढील काळात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही डॉ. कैलास कदम यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. पत्र देण्यापूर्वी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उड्डाणपूलापासून तहसील कार्यालयापर्यंत घोषणा देत आंदोलन केले.