पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती विषयक माहिती व निवडणूक कार्यप्रणालीच्या पुस्तिकांचे प्रकाशन आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठात एका कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे, केंद्रीय पंचायतराज विभागाचे निवृत्त सहसचिव टि.आर. रघुनंदन, ग्राम विकास खात्याचे सचिव असिम गुप्ता, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जगदीश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करण्यात आली होती. सन २०१२ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ५४ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१७ च्या निवडणूकीत त्यामध्ये वाढ होऊन ६५.३५ टक्के मतदान झाले. त्याची मार्गदर्शक पुस्तिका करण्याच्या सुचना निवडणूक आयोगातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने मतदार जनजागृती व निवडणूक कार्यप्रणालीच्या पुस्तिका तयार केल्या होत्या. त्या पुस्तिकांचे प्रकाशन आज राज्यापाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्य़ात आले.