पिंपरी (Pclive7.com):- गरजूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. त्यातून कुटुंब उभे राहत असते. महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने आयोजित केलेल्या विचार प्रबोधन पर्वामध्ये महारोजगार मेळाव्याचे केलेले आयोजन हे महामानवांना ख-या अर्थाने केलेले कृतीशील अभिवादन आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई) तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोरवाडी येथील महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये शहरातील सुमारे ५३५ उमेदवारांनी प्रत्यक्ष नोंदणी करून उस्फुर्त सहभाग नोंदवला. त्यापैकी ३७३ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. यावेळी टाटा मोटर्स, महिंद्रा सीआयइ ऑटोमोटिव्ह, केएसबी लिमिटेड, बिव्हिजी इंडिया लिमिटेड यांसारख्या ३८ नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, बानाईचे अध्यक्ष तथा प्रबोधनपर्वाचे संयोजक विजय कांबळे, पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हनुमंत नलावडे, बानाईचे प्रतिनिधी प्रकाश दामोदरे, अनिल सूर्यवंशी, शामसुंदर बनसोडे, राहुल गायकवाड, प्रवीण शिंदे, स्वप्निल काकडे, महेश झगडे, प्रीती यादव, मोरवाडी आयटीआयचे कार्यालय अधीक्षक उमा दरवेश, गटनिदेशक मनोज ढेरंगे, रविंद्र ओव्हाळ, प्रकाश घोडके, ज्योत सोनवणे, मंगेश कलापुरे, निलेश लांडगे, अमोल शिंदे, उज्ज्वला सातकर, अरुण बांबळे, शर्मिला काराबळे, पूनम गलांडे, जीवन ढेकळे, विक्रम काळोखे, यांच्यासह विजय चावरिया, विजय भैलूमे, प्रवीण शेलार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाळासाहेब रोकडे, शाम सोनवणे, दिलीप गुंजाळ, रोहिणी रासकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, बौध्द विकास महासंघ, वही पेन संकलन समिती,भारतीय बौद्धजन विकास समिती यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच रोजगार मेळाव्यासाठी आलेले उमेदवार उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, शहरातील गरजू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते. ही गरज ओळखून महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामध्ये विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख तसेच व्यवसायभिमुख व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या ठिकाणी उत्तम पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होणार आहे. आगामी काळात औद्योगिक आस्थापनांशी समन्वय साधून त्यांना अपेक्षित कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन महापालिकेचा औद्योगिक प्रशिक्षण विभाग अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा मानस आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळवून देण्याचा उद्देश आहे. उमेदवारांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य, मुलाखतीला कसे सामोरे जावे, स्वतःला उत्तम पद्धतीने कसे सादर करावे या महत्वाच्या गोष्टींवर देखील तरुणांनी काम करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बानाईचे अध्यक्ष तथा प्रबोधनपर्वाचे संयोजक विजय कांबळे यांनी केले. तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले. बानाईचे प्रतिनिधी प्रकाश दामोदरे यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश सांगितला तसेच इतर माहिती विषद केली.