पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राज्य शासनाचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र) चिखली येथील जाधववाडी येथे सोमवारी (दि.१) सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी महापौर राहुल जाधव, अश्विनी जाधव, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, उपायुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.
दवाखाना दुपारी २ ते रात्री १० या वेळेत खुला असणार आहे. तेथे मोफत तपासणी व औषधोपचार केले जाणार आहेत. टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण केले जाणार आहे. महिन्यातून निश्चित दिवसी नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, समुपदेशन सेवा, विशेष उपचार सेवा दिल्या जातील.