पिंपरी (Pclive7.com):- हॉटेलची प्रसिद्धी होण्यासाठी त्यांची ऑनलाइन लिंक पाठविली जाईल. तुम्ही फक्त तिला रेटिंग द्यायचे. त्या बदल्यात तुम्हाला कमिशन दिले जाईल, असे आमिष दाखविले. सुरुवातील पैसेही दिले. या टास्कमध्ये अधिक पैसे गुंतविले, तर त्याचा चांगला परतावाही मिळेल, असे सांगून पैसे भरण्यास भाग पाडून तरुणाची तब्बल १० लाख ९५ हजार ८२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना १० मे ते १७ मे या कालावधीत चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी गणेश मुकुंद अमृतकर (वय २८, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२५) फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी टेलिग्राम चॅनल चालक याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. त्यामध्ये बिझनेससाठी हॉटलेला रेटिंग दिले, तर हॉटेलची सकारात्मक प्रतिमा तयार होईल, असे सांगून रेटिंग दिल्यानंतर पैसे मिळतील, असे आमिष दाखविले. फिर्यादी यांना आलेल्या लिंकवर क्लिक करून, हॉटलेला एका वेबसाइटच्या माध्यमातून रेटिंग द्यायचे होते. त्या बदल्यात फिर्यादी यांना सुरुवातीला चांगले पैसेही मिळाले. फिर्यादी यांनी या टास्कमध्ये पैसे गुंतविले, तर त्यांना चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना एका टेलिग्राम चॅनलमध्ये घेण्यात आले. त्यातून फिर्यादी यांनी टास्क पूर्ण करताना अधिक पैशांच्या आमिषाने आरोपींनी दाखवून तब्बल १० लाख ९५ हजार ८२ रुपये भरण्यास भाग पाडून, या पैशांचा परतावा दिला नाही.