महापुरुषांचा वैचारिक वारसा जपण्याचा दिला संदेश; राजमाता जिजाऊ महाविद्यालयाची संकल्पना
पिंपरी (Pclive7.com):- पंढरीच्या विठ्ठल भेटीची आस लागलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पंढरपुरकडे मार्गस्थ झाला. या पवित्र पालखी सोहळ्याचे दर्शन आणि निरोप घेण्यासाठी भोसरी लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातील विद्यार्थी वारकऱ्यांनी ऐतिहासिक वेशभूषा परिधान करुन भोसरी ते दिघीतील मॅगझीन चौक पायी वारी केली.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांची दिंडी आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास दरमजल करत लांडेवाडी, पीसीएमटी चौक, गव्हाणे वस्ती मार्गे मॅगझीन चौकात पोहोचली. ज्ञानेश्वर माऊली… विठ्ठल विठ्ठल.. हरिनामाचा हो.. असा नामघोष करत विद्यार्थी वारकरी विठ्ठलभक्तीने तल्लीन झाले होते. माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेण्याची त्यांना ओढ लागली होती. सकाळी नऊ वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुक पालखी सोहळ्याचे मॅगझीन चौकात आगमन होताच वातावरण प्रफुल्लीत झाले.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने माऊलींच्या पादुकांवर पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थी वारकऱ्यांनी माऊलींच्या पादुकांचे भक्तीमय वातावरणात दर्शन घेतले. हरिनामाचा नामघोष करत टाळ… मृदंग.. वीणेच्या वाद्य वदनात तल्लीन झालेले वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, चोपदार, मावळे अशी विविध वेशभूषा परिधान करुन विद्यार्थी वारकऱ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संदेश ही समाजाला दिला. दिंडीतील विद्यार्थी वारकऱ्यांनी साश्रु नयनांनी माऊलींच्या पालखीला निरोप दिला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, खजिनदार अजित गव्हाणे, सल्लागार विक्रांत लांडे, सचिव सुधीर मुंगसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, डॉ. नेहा बोरसे, प्राचार्या डॉ. श्रेया दाणी, रजिस्ट्रार अश्विनी भोसले, डॉ. गणेश चव्हाण, प्रा. गोपीचंद करंडे व विद्यार्थी उपस्थित होते.