पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या गुरुवारी (दि.१५ जून) रोजी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.१६ जून) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.