पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील आरक्षण क्र.३६१ मधील गार्डनचे आरक्षण बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करण्यात यावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.
नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील सर्वे नं.२१ मध्ये आरक्षण क्र.३६१ नुसार गार्डनचे आरक्षण आहे. ते बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल विकसित करण्यात यावा. प्रभागातील सद्य परीस्थीती पाहता पिंपळे सौदागर या प्रभागात महापालिकेच्या वतीने सर्व सोयीसुविधा युक्त अशी ३ गार्डन व २ प्ले ग्राउंड विकसित करण्यात आली आहेत. येथील नागरिक देखील त्याचा मनसोक्त पद्धतीने आनंद घेत आहेत.
तसेच पिंपळे सौदागर परिसरात एकूण २३० व त्यापेक्षा जास्त निवासी सोसायटी आहेत. त्यामधील सर्व नागरिकांना जलतरण तलाव व बॅडमिंटनचा सराव करण्यासाठी पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, थेरगाव, किंवा खासगी ठिकाणी जावे लागते. तसेच सर्वात जास्त कर भरणारे नागरिक या परिसरात राहतात. त्या करदात्यास सोयीसुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. नागरिकांची हि परवड पाहता पिंपळे सौदागर येथे आता गार्डनची गरज नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिक पिंपळे सौदागर परिसरात जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल बांधावा अशी सातत्याने मागणी करत असतात. मुळात नागरिकांची हि मागणी रास्त असल्याने याचा विचार करता पिंपळे सौदागर मधील नागरिकांना या परिसरात जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉलची सुविधा देणे गरजेचे आहे.
तरी सर्व बाबीचा विचार करुन पिंपळे सौदागर येथील सर्वे नं.२१ मधील आरक्षण क्र.३६१ गार्डन या आरक्षण बदलाचा निर्णय घेवून पिंपळे सौदागर येथे सुसज्ज जलतरण तलाव व बॅडमिटंन हॉल तयार करण्यात यावा अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.