पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
भाजपची राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष १५ मे आणि नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या. ‘मोदी @9’ या मोहिमेमुळे या नेमणुकांना ब्रेक लागला होता. अखेरीस नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते.परंतू, पक्षाने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने आता शंकर जगताप यांच्यावर शहराची जबाबदारी दिली आहे.
महापालिका निवडणुक, लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत महापालिकेत सत्ता कायम ठेवणे हे त्यांच्यापुढील प्रमुख आव्हान असणार आहे.