पिंपरी (Pclive7.com):- इर्सालवाडी येथे मोठी दुर्घटना घडली. ज्यात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू आहे. मृतांच्या नातेवाइकांच्या दुःखात संपूर्ण भाजप परिवार सहभागी आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलंही सेलिब्रेशन केलं जाणार नाही. राज्यात काही भागात पूरस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीनं आज (दि.२२) सेवा दिवस साजरा केला जाणार आहे.
भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने संपूर्ण शहरात ५३ हजार झाडांचे वृक्षारोपण करत महाभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागात आधारकार्ड अपडेट सुविधा केंद्र आणि मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागात सेवा दिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
ते म्हणाले की, भारतीय परंपरेमध्ये ‘सेवा’ ही वृत्ती, भावना, सेवा कोणाची घडावी? शेवटचा माणूस. दासांचाही दास. त्याची सेवा माझ्या हातून घडली म्हणजे ईश्वराचे खरे पूजन झाले. अर्थात शेवटचा माणूस आणि हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात की शेवटच्या माणसाचा विकास हे आपले ध्येय आहे.
सरकारपातळीवर अनेक योजनांच्या माध्यमातून सेवा घडत असते. तथापि, भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, शनिवार, दि.२२ जुलै रोजी राज्यभर सेवादिवस साजरा करण्याचा संकल्प भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. या सेवादिवसाच्या निमित्ताने भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आप आपल्या कार्यक्षेत्रात सेवा उपक्रम राबवतील.