‘तू करदाता, तू करविता’ नावीन्यपूर्ण अभियान, ऑनलाइन सवलती आदींची मिळणार माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे मालमत्ताकरासंदर्भातील विविध प्रश्न, अडचणी, कराच्या संदर्भातील शंकाचे निरसन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. करसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व ऑनलाइन पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा झाल्याने नागरिक करसंवादामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित आहेत. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी होणारा करसंवाद शनिवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून करसंवादामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करआकारणी व करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
करसंवादासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तळमजल्यावरील करसंकलन विभागामध्ये नागरिकांनी उपस्थित राहवे. मिळकतकर आकारणी, मालमत्ता हस्तांतरण, ऑनलाइन सवलतींबाबत असणाऱ्या प्रश्नांचा निपटारा साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडून करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी उपस्थित असतील. यामुळे नागरिकांच्या प्रश्नांचे समक्षपणे अधिकाऱ्यांमार्फत निरसन होणार आहे.
‘तू करदाता, तू करविता’ अभियानाबाबत मिळणार माहिती..
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाद्वारे मालमत्ताकराबाबत जनजागृती करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे करदात्यांमध्ये मालमत्ताकराबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. ‘तू करदाता, तू करविता’ अभियानाच्या माध्यमातून महापालिका करदात्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करणार आहे. महापालिकेद्वारे येणाऱ्या सोयी-सुविधांचे सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर झालेले सकारात्मक परिणामही नागरिकांच्या समोर मांडण्यात येणार आहेत. जागरूक करदात्यांनी वेळेवर कर भरल्याने शहराचा झपाट्याने विकास शक्य झाला आहे. त्यामुळे करदात्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचे ‘तू करदाता, तू करविता’ अभियानाबाबतही करसंवादामध्ये माहिती सांगण्यात येणार आहे.