पिंपरी (Pclive7.com):- प्रॉपर्टीच्या हिश्याची मागणी करत पत्नी व मेहुण्याने तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना (९ ऑगस्ट) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास मोशी टोलनाका येथे घडली.
राहुल तुकाराम सस्ते (वय ३३, रा. बारणे वस्ती, मोशी) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी रविवारी (दि.२०) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल याची पत्नी आणि मेहुणा शैलेश दत्तात्रेय साखरे (वय ३०, रा. लक्ष्मी नगर, मोशी) अशी आरोपींची नावे आहेत. ९ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास आरोपी पत्नी आणि मेहुणा फिर्यादीच्या घरी आले. फिर्यादीस प्रॉपर्टीच्या हिश्याची मागणी करत पत्नीने शिवीगाळ करत हाताने राहुल यांना मारहाण केली.
तसेच किचन मधील सुरी घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून गेल्या. मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ करत सिलेंडरकडे जाऊन पाइप काढण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्हा सर्वांना जाळून मारून टाकते’, अशी धमकी दिली. तसेच आरोपी मेहुणा शैलेश याने शिवीगाळ करून लोखंडी रॉडने फिर्यादी राहुल यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर जोरात मारून गंभीर जखमी करून डाव्या हाताच्या कोपराचे हाड फॅक्चर केले.
दरम्यान राहुल यांची पत्नी शिवीगाळ करत बेडरुममध्ये गेली. आणि राहुल यांनी रात्री झोपताना बेडरुममध्ये काढुन ठेवलेले हातातील ८ तोळ्याचे ब्रेसलेट, ५ ग्रॅम सोन्यामधील डायमंड रिंग, १० ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी दोन सोन्याच्या अंगठ्या घरातुन घेवुन गेली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.