पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणेशोत्सव सणानिमित्त अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक व घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त व अपर पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस दलाकडून ०५ पोलीस उप आयुक्त, ०८ सहायक पोलीस आयुक्त, ५९ पोलीस निरिक्षक, १७७ सपोनि / पोउप-नि १८५० पोलीस अंमलदार, २३९ होमगार्ड, ०१ एसआरपीएफ कंपनी, ०४ आरसीपी, १८ स्ट्रायकिंग व १६८ ट्राफिंग वॉर्डन असा एकूण २५० अधिकारी व २३५७ अंमलदार यांची बंदोबस्तकामी नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच पुरेसा राखीव बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये विसर्जन मिरवणूकीदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होवू नये याकरीता शहर पोलीस दलाकडून गणेशोत्सव दरम्यान संवेदनशील भागामध्ये व मिश्र वस्तीमध्ये पथ संचलन करण्यात आलेले आहे. तसेच विसर्जन मार्गावर व प्रत्येक विसर्जनाची ठिकाणे सीसीटिव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेली आहेत.
गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर १३१३ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. विसर्जन मिरवणूक दरम्यान चोरी पाकिटमारी होवू नये याकरीता गुन्हे शाखेकडून ०५ पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील विविध मिरवणूक मार्गाची घातपात विरोधी तपासणी करण्यात आलेली असून, ध्वनी प्रदुषण करणा-या मंडळाचे नॉईज लेव्हल मिटरव्दारे रिडिंग घेण्यासाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत. मिरवणूकी दरम्यान प्रत्येक सार्वजनिक मंडळाचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत येणा-या विसर्जन स्थळासह ८९ नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त १० कृत्रिम तलावाची महापालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रमुख विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतूकीचे योग्य नियमन करणेकरीता चोख उपाययोजना करण्यात आलेली आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी देखील चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.