पिंपरी (Pclive7.com):- सिंहगड रस्त्यावर अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून झाला आहे. ही घटना सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अतिशय शांततेत पार पडल्यानंतर सायंकाळी सिंहगड रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली आहे. विजय ढुमे हे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्यांशी मैत्रीचे संबंध होते. तसेच अनेक भाई, राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते. क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला.
काही वेळात विजय ढुमे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. सिंहगड रोड पोलिस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.