पिंपरी (Pclive7.com):- अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गुरुवार दि.२९ रोजी पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर विसर्जन घाट याठिकाणी बाप्पाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सवात साजरा करण्याचे आवाहन प्रभागातील नागरिकांना करण्यात आले होते.
गणेश विसर्जनकाळात नद्यांच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असते. गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे नदीमध्ये प्रदूषण विषयक समस्या निर्माण होत असतात व नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी आणि त्यातच भाविकांचे होणारे स्नान यामुळे आरोग्य विषयक समस्या देखील उद्भवू शकतात यात शंका नाही. पवना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचे प्रयत्न फलदायी ठरले असून परिसरातून दहा हजार पेक्षा जास्त मूर्तीचे संकलन करण्यात यश आले आहे.
या अभियानांतर्गत परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे. मूर्ती संकलन अभियानाच्या माध्यमातून गणेश विसर्जनाचा सोहळा अत्यंत शिस्तीने व सर्व प्रकारची गर्दी टाळत साजरा करण्यात आला आणि या गर्दीमुळे घडणारे अनुचित प्रकारही टाळता आले.