पिंपरी (Pclive7.com):- ग्राहकाच्या घरी सोलर सिस्टिम बसवल्याबाबत तपासणी अहवाल देण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने सोलर सिस्टिमच्या ठेकेदाराकडे दहा हजारांची लाच मागितली. याची पडताळणी करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्रकुमार साळुंखे असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने एसीबी कडे तक्रार केली आहे.
तक्रारदार हे सोलर सिस्टिमचे ठेकेदार आहेत. सोलर सिस्टिम बसविण्याबाबत ग्राहक व एमएसईडीएल यांच्यामध्ये ते लायझनिंगचे काम करतात. तक्रारदार यांनी एका ग्राहकाच्या घरी सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशनचे काम केले होते. त्या कामाची एनओसी / तपासणी अहवाल मिळण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. त्याचा पाठपुरावा तक्रारदार स्वत: करीत होते. लोकसेवक राजेंद्रकुमार साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडे एनओसी व मीटर टेस्टींगसाठी १० हजार रुपये लाच मागितली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने २३ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यामध्ये कार्यकारी अभियंत्याने या कामासाठी स्वतःसाठी तसेच कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा एसीबीकडून तपास केला जात आहे.