पिंपरी (Pclive7.com):- मुंबई येथून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी आणलेले मेफेड्रॉन (एमडी) पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने चिखली येथे जप्त करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ११६ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास केली.
रामकुमार रामसजीवन मिश्रा (४५, रा. नालासोपारा, पालघर. मूळ रा. उत्तर प्रदेश), अब्दुल मुशरफ अली कलीम ऊर्फ सिद्दिकी (३५, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी बुधवारी (दि. ११) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जाधववाडी कुदळवाडी रस्त्यावर वडाचामळा येथे दोघे जण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी रामकुमार आणि अब्दुल या दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले.
संशयिताविरोधात गुन्हा
दोघांकडे ११६ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. एकूण १३ लाख ३५ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितानी हे ड्रग्ज गोरेगाव मुंबई येथून महंमद शकील ऊर्फ गुप्ता याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. त्यामुळे महंमद शकील ऊर्फ गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.