पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील विविध सोसायटीतील चेअरमन, सभासद, परिसरातील जेष्ठ नागरिक, व्यापारी यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘प्लॅस्टिकमुक्त पिंपळे सौदागर’ या मोहिमेला पिंपळे सौदागरवासीयांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने परिसरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, सिध्दार्थ नाईक, संतोष मस्कर, सचिन देसाई , आनंद दफ्तरदार, मिश्रा, विवेक तितरमारे, देवरे, राजेश पाटील, अखिलेश दिक्षीत, महेश पाठक, व पिंपळे सौदागर मधील विविध सोसायटीचे कमिटी मेंबर्स सदस्य जेष्ठ नागरिक , महिला, व्यापारी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्लास्टिक मुक्तीची चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी नगरसेवक नाना काटे यांनी नागरिकांना आवाहन केले. ते म्हणाले की, पिंपळे सौदागर परिसरात जर कोणताही व्यापारी, दुकानदार ग्राहकांना प्लास्टिक पिशवी देत असेल तर नागरिकांनी त्याच क्षणी फोटो काढून ९८६०००१११२ या वॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा व फोन करावा जेणेकरून संबंधित व्यापा-यावर प्लास्टिक बंदीच्या कायद्या अंतर्गत त्वरित कारवाई करणे सोयीस्कर होईल. त्यानुसार व्यापा-यावर, दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल. वॉट्सअॅप अंतर्गत हा उपक्रम जोपर्यंत पिंपळे सौदागर परिसर प्लास्टिकमुक्त होणार नाही तोपर्यंत चालूच ठेवण्यात येईल असेही ते म्हणाले.