पिंपरी (Pclive7.com):- इंग्लंड विरुध्द दक्षिण अफ्रिका सामन्यावर बेटींग घेणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील मोठ्या बुकीला पोलिसांनी अटक केली आहे. या बुकीकडून पोलिसांनी ४० लाख रुपये हस्तगत केले आहे. गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे. दिनेश हरीश शर्मा (वय ३८ रा. काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
काल (दि.२१) रोजी गुंडा स्कॉडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने यांना माहिती मिळाली की काळेवाडी येथे दिनेश हरीश शर्मा हा क्रिकेट लाईव्ह लाईन गुरु या सोशल मिडीया अॅपव्दारे क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा घेत आहे. त्यानुसार गुंडा स्कॉडच्या टीमने काळेवाडी आदी आम्मा ब्लीस सोसायटी, निरंकारी भवन जवळ, दिनेश शर्मा यांच्या फ्लॅटवर छापा टाकून बेटिंगचा पर्दाफाश केला आहे. चाळीस लाखांच्या रोकड आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच वर हा सट्टा खेळला जात होता. ‘क्रिकेट लाईव्ह लाईन गुरू’ या अँपवर अनेकांना आमिष दाखवलं जात होतं. इंग्लंड जिंकल्यास १ रुपयाला ६० पैसे, तर साऊथ आफ्रिका जिंकल्यास ६१ पैसे असा भाव मॅचपूर्वी ठरलेला होता. पण मॅचची रंगत वाढत जाते तसा भाव चढत जात होता. शनिवारी ‘हाई-लगाई’ नावाने हाच सट्टा सुरू होता. तंत्रज्ञानाचा वापर करत गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील आरोपीच्या राहत्या घरावर छापा टाकला आणि या सट्टेबाजीचा पर्दाफाश केला. घटनास्थळी ४० लाख ८० हजारांची रोकड आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुढील तपास गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार पोपट हुलगे यांनी केली.